सधन लाभार्थ्यांनो अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा; जिल्हाधिकाऱ्यांचे निमा अरोरा यांचे आवाहन
सधन लाभार्थ्यांनो अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा; जिल्हाधिकाऱ्यांचे निमा अरोरा यांचे आवाहन
अकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार पात्र असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्य सवलतीचा लाभ दिला जातो. परंतु ज्या पात्र लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याची आवश्यकता नाही, अशा सधन नोकरदार, व्यवसायी व शेतकरी लाभार्थ्यांनी स्वेच्छेने अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
राज्यामध्ये दि. 1 फेब्रुवारी 2014 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विविध अटीनुसार पात्र असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रति माह 35 किलो व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रतिमाह पाच किलो अन्नधान्याचा सवलतीच्या दराने लाभ देण्यात येतो. जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या शिधापत्रिकाच्या आधार सीडींग मुळे योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याकरिता योग्य लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आधारसीडींग मुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित व मयत इत्यादी लाभार्थ्यांना वगळण्यात आले असले तरी पात्र लाभार्थ्यांमधील ज्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याची आवश्यकता नाही अशा लाभार्थ्यांनी स्वेच्छेने या योजनेमधून बाहेर पडावे. यामुळे गरजू लाभार्थी इष्टांक मर्यादेमुळे योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकले नाहीत अशा लोकांना योजनेचा लाभ मिळेल.
25 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार अंत्योदय अन्न योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याची आवश्यकता नाही, अशा लाभार्थ्यांनी स्वेच्छेने अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडण्यासाठी दि. 25 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत पात्र लाभार्थ्यांनी स्वेच्छेने दि. 25 फेब्रुवारीपर्यंत अन्नधान्य योजनेतुन बाहेर पडावे. याकरीता तहसील कार्यालय व रास्तभाव दुकानदार यांच्याकडे अर्ज करावा. त्यानंतर स्थानिक दक्षता समिती ग्रामपंचायत मार्फत अन्नधान्याचा लाभ घेणारे अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेवून संबंधित तहसील कार्यालयास अहवाल सादर करतील.
नोकरवर्ग, व्यवसायी व सधन शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेवू नये
शासकीय व निमशासकीय नौकरीत असणारे लाभार्थी, खाजगी नौकरी, व्यवसाय करणारे ज्यांचे उत्पन्न 60 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे असे लाभार्थी, चार चाकी वाहन असणारे लाभार्थी, पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असणारे सधन शेतकरी व पेंशनधारक लाभार्थ्यांनी अन्नधान्य सवलतीच्या योजनाचा लाभ घेवू नये.
अपात्र लाभार्थ्यांवर होणार कार्यवाही
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार अपात्र असलेला लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्यास अशा लाभार्थ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955चे कलम 9 अन्वये पाच मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंडासह दोन्ही शिक्षेस पात्र राहिल. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 420 नुसार शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल होईल. नियमशिधापत्रिका संबंधात कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधिताना दिले आहे.
- सतिश लाहुळकर
Comments
Post a Comment